रीलच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
बारामती : तांदुळवाडी (ता. बारामती) येथे सोशल मीडियावर टाकलेल्या इन्स्टाग्राम रीलच्या वादातून १८ वर्षीय तरुणावर झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. १८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय १८, रा. तांदुळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखी कार्यक्रमानिमित्त भाविकांना जेवण वाढण्याचे काम करत होता. यावेळी गावातील एका तरुणाने त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. सदर व्हिडिओ डिलीट करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
त्यानंतर पप्पू शितोळे याने काम असल्याचे सांगून सार्थकला मंदिराच्या मागील बाजूस नेले. तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजीत शेळके, अरुण जाधव व अन्य काही इसम उपस्थित होते. सर्वांनी मिळून सार्थकला शिवीगाळ करत जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेले. तेथे त्याला खाली पाडून गज, तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
यावेळी गणेश जाधव याने गचुंडे धरून पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली.
जीवाच्या भीतीने तत्काळ तक्रार न देता दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्यानंतर सार्थकने आईसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गंभीर दुखापत व शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची गंभीर दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी तातडीने पथक पाठवून मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय ३४) व पप्पू शितोळे (वय ३४, दोघेही रा. तांदुळवाडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर झालेल्या दुसऱ्या झटापटीत एका अल्पवयीन मुलाच्या डोक्याला कोयत्याने दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या तक्रारीवरून सार्थक अंबोरे, आकाश अंबोरे, बापू अंबोरे, पोपट अंबोरे व लखन अंबोरे (सर्व रा. तांदुळवाडी) यांच्याविरोधात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सेहगिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, तसेच पोलीस अमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा दराडे व आफ्रिन शेख यांनी केली आहे.
