January 22, 2026

बारामतीत खळबळजनक प्रकार; इन्स्टाग्राम व्हिडिओ डिलीट करण्याच्या कारणावरून अल्पवयीनावर पिस्तुल व कोयत्याचा धाक

82_IMG_20190704_114900

बारामती : “तू इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी दिसतो, तो व्हिडिओ तात्काळ डिलीट कर,”  असे सांगत एका अल्पवयीन तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना बारामती शहरात घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर मारहाण व शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री 8:00 वाजता तांदुळवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या मागील परिसरात घडली. या घटनेत तांदुळवाडी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, सार्थक लक्ष्मण अंबुरे, आकाश धनंजय अंबुरे, बापू गौतम अंबुरे, पोपट गौतम अंबुरे व लखन अशोक अंबुरे (सर्व रा. तांदुळवाडी, बारामती) यांनी संगनमताने या तरुणावर हल्ला केला.

आरोपींनी “तू लय बोलतोय का ?” असे म्हणत पिस्तूल काढून दाखवले व “तुला बघायचे का ?” अशी धमकी दिली. यानंतर कोयत्याने डोक्यात वार केल्याने अल्पवयीन तरुण गंभीर जखमी झाला. यावेळी आरोपींनी, “हा प्रकार घरी सांगितलास किंवा पोलिसांत तक्रार दिलीस, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही,” अशी जीवघेणी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, सोशल मीडियावरील वादातून थेट शस्त्रसज्ज हल्ल्यापर्यंत मजल गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!