January 14, 2026

बारामतीत ‘जॉईंट किलर’ आणि ‘सायलेंट किलर’ची चर्चा.

7

बारामती : बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा निकाल लागल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. “एक ठरला जायंट किलर तर दुसरा ठरला सायलेंट किलर ” अशी उपमा देत नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक अपक्ष उमेदवारांच्या विजयाकडे पाहत आहेत.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी मोठ्या पक्षांच्या आणि बलाढ्य नेतृत्वाच्या राजकीय गणितांनाच छेद दिला आहे.अपक्ष उमेदवार यशपाल पोटे यांच्या लढतीकडे पाहिल्यास, त्यांच्या समोर बारामतीचे प्रस्थापित नेतृत्व उभे होते. मात्र, या नेतृत्वाला पराभूत करत यशपाल पोटे यांनी अपेक्षाभंगाचा धक्का दिला. त्यामुळेच त्यांना आता “जॉईंट किलर” अशी उपमा दिली जात आहे. कारण, एका व्यक्तीने नव्हे तर संपूर्ण राजकीय समीकरणालाच त्यांनी एकत्रित धक्का दिला असल्याची चर्चा गल्लोगल्लीत ऐकू येत आहे.

दुसऱ्या बाजूला, अपक्ष उमेदवार निलेश इंगोले यांची निवडणूक लढत मात्र पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची ठरली. कोणताही मोठा गाजावाजा नाही, पक्षाचा आधार नाही, ना मोठी यंत्रणा तरीही त्यांनी “एकला चलो रे” या भूमिकेतून उमेदवारी अर्ज भरला. एकट्याने प्रचार केला, कमी बोलणे आणि जास्त काम या सूत्रावर त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. निकालात मात्र त्यांनी अपेक्षेपेक्षा मोठा प्रभाव दाखवत विजय मिळवला आणि त्यामुळेच त्यांची ओळख “सायलेंट किलर” म्हणून होऊ लागली आहे.

या दोन्ही विजयांमुळे बारामतीच्या राजकारणात एक वेगळाच संदेश गेला आहे. मतदार आता केवळ पक्ष किंवा मोठ्या नावांवर नाही, तर स्थानिक प्रश्न, व्यक्तिमत्त्व आणि कामावर मतदान करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चौकाचौकात, चहाच्या टपऱ्यांवर आणि राजकीय चर्चांमध्ये “एक ठरला जॉईंट किलर आणि एक ठरला सायलेंट किलर” अशीच उपमा दिली जात आहे.

एकूणच, बारामती नगरपालिकेच्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या यशामुळे आगामी राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठे नेतृत्व असो वा प्रस्थापित पक्ष, जनतेचा कौल मिळवण्यासाठी आता अधिक सजग आणि जमिनीवरचे काम करणे अपरिहार्य ठरणार आहे.

error: Content is protected !!