January 13, 2026

मुलीचा विजय… बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू !

6

बारामती : राजकारणात विजय-पराभव हे नेहमीचेच; मात्र काही क्षण असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, नातेसंबंध आणि भावनांचा जिवंत ठसा उमटवतात. असाच एक हृदयस्पर्शी क्षण बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला.

बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काळुराम चौधरी हे स्वतः नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिंगणात होते. चुरशीच्या लढतीत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वतःचा पराभव जरी त्यांच्या वाट्याला आला असला, तरी त्याच निवडणुकीत त्यांच्या कन्या संघमित्रा काळुराम चौधरी हिने मिळवलेला विजय हा त्या पराभवावर मात करणारा ठरला. मुलीच्या यशाने काळुराम चौधरी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि उपस्थितांच्या डोळ्यांसमोर एक अविस्मरणीय दृश्य उभे राहिले.

संघमित्रा चौधरी हिने बारामती नगरपालिकेत बहुजन समाज पार्टीचा इतिहास घडवला आहे. या विजयामुळे बारामती नगरपालिकेत प्रथमच बहुजन समाज पार्टीचा झेंडा फडकला असून, हा विजय अनेक अर्थांनी कौतुकास्पद मानला जात आहे. सध्या वकिलीचे शिक्षण घेत असलेली संघमित्रा अल्पावधीतच प्रभाग क्रमांक १४ मधील मतदारांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. प्रस्थापितांना छेद देत मतदारांनी संघमित्रावर विश्वास टाकला. “बदल हवा आहे” हा स्पष्ट संदेश देत मतदारांनी निर्भयपणे मतदान करून संघमित्राच्या पारड्यात कौल टाकला. तरुणाई, अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिक संपर्क याची पावती मतदारांनी या विजयातून दिली आहे.

हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, बारामतीच्या राजकारणात बदल घडू शकतो याचे स्पष्ट संकेत देणारा ठरला आहे. मुलीचा विजय आणि बापाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हा क्षण बारामतीच्या राजकीय इतिहासात भावनाप्रधान आठवण म्हणून नोंदवला जाईल, यात शंका नाही.

error: Content is protected !!