October 23, 2025

पुन्हा हायवा–स्कूलबस अपघात; नागरिकांचा संताप

321

बारामती : शहरातील पाटस रोडवर शाहू शाळेच्या जवळ पुन्हा एकदा हायवा आणि स्कूलबसचा अपघात झाला. सुदैवाने बसमधील विद्यार्थी तसेच कोणत्याही नागरिकाला दुखापत झाली नाही. पण कालच घडलेल्या अपघाताची धग ओसरत नाही तोच हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

डंपरला नंबर प्लेट नाही, पासिंग नाही – नागरिकांचा संताप वाढला

अपघातात असलेल्या डंपर वाहनाला नंबर प्लेट नव्हती आणि आवश्यक तांत्रिक पासिंगही नव्हते. अशा वाहनांना रस्त्यावर वाहतूक करण्याची मुभा कोणी दिली, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बेदरकपणे शहरात वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर कोणाचे छत्र आहे आणि प्रशासन बारामतीत लोकाभिमुख भूमिका घेत आहे का ? याबद्दल संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

कालच झालेल्या भीषण अपघातानंतर सकाळी नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासकीय भवनावर निषेध नोंदवला होता. शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि अपघातग्रस्त कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागण्यांसह सकाळी झालेल्या मोर्च्यात नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला होता, मात्र दुपारीच पुन्हा स्कूलबस आणि हायवा यांचा अपघात घडल्याने संतापाचा क्षोभ उसळला. नागरिकांनी तत्काळ पाटस रोडवर रास्ता रोको करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

“हायवा बंदीचा निर्णय अमलात आणा” – नागरिकांची मागणी

बर्‍याच दिवसांपासून शहरात हायवा व डंपर वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत असताना प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला. “डंपर चालकांनी बारामतीकरांना ठार मारण्याचा विडा उचलला आहे काय ?” असा संतप्त सवाल महिलांसह सर्व स्तरांतून ऐकू आला.

सलग अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांवर कडक निर्बंध आणावेत, नियमांचे पालन न करणाऱ्या चालक व मालकांवर तातडीची कारवाई करावी आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!