मृतदेह मुरुमाखाली लपवला; नारोळीत परराज्यातील मजुराची हत्या

बारामती : नारोळी (ता. बारामती) येथे कामासाठी आलेल्या मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी फरार असून सुपे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
गणेश शंकर चव्हाण (वय ४९, मूळ रा. आद्रहळी, ता. शिराटी, जि. गदक, कर्नाटक; सध्या रा. नारोळी ता . बारामती ) अशी खून झालेल्याची ओळख पटली आहे. तर नागेश चंदबसप्पा बुधियाला (मूळ रा. कर्नाटक, संपूर्ण पत्ता उपलब्ध नाही) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
महाडिक यांच्या नारोळी येथील फार्महाऊसवर बांधकाम सुरू असून तेथे गणेश चव्हाण मजुरीला होता. तो २२ सप्टेंबर २०२५ रोजी हरवल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. शुक्रवारी (ता. २६) त्याचा मृतदेह मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली दबलेला आढळला.
घटनास्थळी पंचनाम्यासह तपास करण्यात येऊन महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले. हवालदार रूपेश साळुंके यांनी याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास फौजदार जिनेश कोळी करत आहेत.