October 24, 2025

शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’

MSEDCL Sports Body Building 06-02-2025

बारामती : वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला.

दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अतितटीच्या लढतींमुळे रंगतदार होत आहे. सांघिक कामगिरीमध्ये पहिल्या दिवशी पुणे-बारामती संघाने वर्चस्व ठेवत आगेकूच सुरु केली.

महावितरणच्या क्रीडास्पर्धेत यंदा प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला. बुधवारी (दि. ५) रात्री विविध वजनगटात शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल ३१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत कोल्हापूरच्या राहुल विजय कांबळे यांनी ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. त्यांच्यासह विविध वजनगटातील विजेते व उपविजेत्यांना पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  संजय ढोके यांच्याहस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये वजनगटनिहाय विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – ६५ किलो- सुनील सावंत (कल्याण-रत्नागिरी) व विशाल मोहोळ (पुणे-बारामती), ७० किलो– अमित पाटील (कोल्हापूर) व मोहम्मद जरीन शेख (अकोला-अमरावती), ७५ किलो- प्रवीण छुनके (कोल्हापूर) व नामदेव शिंदे (नाशिक-जळगाव), ८० किलो- राहुल कांबळे (कोल्हापूर) व दिनेश धाडे (नाशिक-जळगाव), ९० किलो– अपूर्व शिर्के (कल्याण-रत्नागिरी) व गौरव पोवार (कोल्हापूर) आणि ९० किलोवरील सलमान मुंडे (कोल्हापूर).

सांघिक कामगिरीत पुणे-बारामती संघाची आगेकूच…

महावितरणच्या क्रीडास्पर्धेत मागील दोन वर्ष अजिंक्यपदाचे मानकरी झालेले पुणे-बारामती संघाने पहिल्याच दिवशी आगेकूच सुरु ठेवली आहे. या संघाने पहिल्या दिवशी ३ सुवर्ण तर २ रौप्यपदक जिंकले. तर मुख्य कार्यालय-भांडूप संघाने २ सुवर्ण जिंकले.

You may have missed

error: Content is protected !!