October 24, 2025

वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे आवाहन

WhatsApp Image 2025-01-03 at 8.21.34 PM

बारामती : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे.

तरी सर्व संबंधित वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या कामासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एम/एस एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता ३१ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी.

अधिक माहितीकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पी- ९१, कल्याणी नगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्ग, बारामती दु.क्र. ०२११२-२४३१११ या संपर्क क्रंमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!