राज्यामधील अकार्यक्षम पोलीस पाटील तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी
बारामती : राज्यातील अकार्यक्षम पोलिस पाटील यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी जमीन हक्क परिषदेचे बारामती तालुका अध्यक्ष युवराज पोटे यांनी केली आहे.
राज्यातील गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी शासनाकडून पोलीस पाटील पद नेमण्यात आलेली आहेत, पोलीस पाटील पद हे एक प्रकारे गावचा आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा दुवा आहे, गावातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनास गोपनीय रीत्या माहिती देऊन मदत करणे संबंधित पोलिस पाटलाची जबाबदारीचे आणि कर्तव्य असूनही बहुतांश पोलीस पाटील अकार्यक्षम व बेजबाबदारपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत असून सदर पोलीस पाटील यांच्यावर सदोष आरोपपत्र दाखल करून पोलीस पाटील पदाच्या कर्तव्यातून तात्काळ मुक्त करून नव्याने कार्यक्षम पोलीस पाटील उमेदवारांची भरती प्रक्रिया करावी अशी मागणी जमीन हक्क परिषदेचे बारामती तालुका अध्यक्ष युवराज पोटे यांनी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रधान सचिव यांच्याकडे ई निवेदनाद्वारे केली असून सदरचा विषय तारांकित किंवा लक्षवेधी मध्ये घेऊन तमाम राज्यातील जनतेस आश्वासित करावे अशी देखील मागणी केली आहे.
गावचा आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा दुवा असणारे हे पद शासनाने भरीव मानधन देऊन नियुक्त केले आहे मात्र याच पदाचा काही गावात गैर वापर होताना दिसत आहे, तर गावातील अवैध धंदे असणारांची माहिती यांनी द्यायची असताना प्रत्यक्ष काही ठिकाणी हेच मध्यस्थी करून तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था असल्याची गावा-गावात जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
