अजित दादांबाबत तक्रार नाही, पण नवीन नेतृत्व घडले पाहिजे…खासदार शरद पवार.
बारामती : मी राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्यानंतर इथला सगळा कारभार अजित दादांच्या हातात दिला होता, त्यांनी 30 ते 35 वर्षे काम केले, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही तक्रार नाही, मी देखील 25 ते 30 वर्षे काम केले आहे, नंतरच्या काळात दादांनी काम केले आता पुढची तयारी केली पाहिजे, म्हणुन त्यासाठी पुढे 30 वर्षे काम करणारे नेतृत्व इथे देणे गरजेचे आहे असे मत जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केले
युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्ताने शिर्सुफळ येथे प्रचार सभा घेतली होती त्यावेळी जेष्ठ नेते खा. शरद पवार बोलत होते.
पुढे पवार म्हणाले की, संधी ही सगळ्यांना द्यायची असते, आपण कोणाला संधी दिली नाही असे कधी केले नाही. मात्र मीच सगळे घेणार हे योग्य नाही असा चिमटा काढीत नवीन नेतृत्वाच्या दृष्टीने युगेंद्र पवार यांची उमेदवारी दिल्याचे सांगितले. तर बारामतीकरांनी मला, अजितदादाला किंवा सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीत आम्हांला कधी नकार दिला नाही, तुम्ही कधी मत देताना संकोच देखील केला नाही, मात्र पुढे तीस वर्ष काम करू शकेल अशी नवीन पिढी तयार केली पाहिजे, त्यासाठी आम्ही लक्ष घातले आहे, म्हणुन बारामतीमधून युगेंद्र यांना संधी दिली दिल्याचे पवार यांनी व्यक्त केले.
नागरिकांनी फिरविली पाठ
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शिर्सुफळ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र त्या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि चक्क सभेला नागरिकांनी पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले. एकूणच पवार विरोधी पवार या राजकीय संघर्षाला बारामतीकर नापसंती देताना दिसत आहे.
