October 24, 2025

सहीची प्रामाणिकता का ?… केसांनी कापला गळा ? 

WhatsApp Image 2024-11-01 at 6.47.06 PM

दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसानी गळा कापल्याची भावना झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यावर गेल्या दहा वर्षापूर्वीचा विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणूकाचा कार्यकाळ झोळ्यासमोरून सरसर पुढे गेला. आजरोजी सिंचन घोटाळा तसा महाराष्ट्राच्या विस्मरणात गेलेला विषय होता. कारण मतदार जनतेला स्मरणशक्तीची कमजोरी आहे की, ते असे राजकीय मुद्दे सहसा स्मरणात ठेवत नाहीत.  मात्र दादांनी स्वताःच स्वताःवरील आरोपीच्या अनुषंगाने वक्तव्य करून ‘सिंचन घोटाळा’ प्रकरण पुन्हा चर्चेत आणले आहे.  सध्याच्या विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचाराचा मुद्दा नव्हता.  मात्र अजित पवारांनी स्वताःच हा मुद्दा काढून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड उगारली ?.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले खरे पण श्वेतपत्रिका नव्हे तर त्यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही करून केसाने गळा कापल्याची उद्विग्नता अजित पवारांनी बोलून दाखवली. गेल्या दहा वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत  जेष्ट नेते शरद पवारांनी भाजपाला हात दाखवून पाठिंबा दिल्यावर भाजपा सरकार अस्तित्वात आले होते. तर अजित पवारांनी  भाजपाचे सरकार स्थापन केले होते. वास्तविक भाजपाला पाठिंबा दिलेल्या शरद पवार यांना अजित पवार सत्तेत सहभागी झालेले रुचले नाही का ?  यातून काका पुतण्याचे मतभेद समोर आले.  महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद देत अजित पवार यांचे विरोधात सर्व चौकशीत अजित पवारांना क्लिन चिट दिली. क्लिन चिट घेऊन अजित पवार पुन्हा काकांकडे आले उध्दव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुखपद खा. सुप्रिया सुळे यांना दिल्याने अजित पवार अस्वस्थ झाल्याचे टीव्ही चॅनेलच्या पटलावर दिसले होते. परिणामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष फुटला अन् काका पुतण्यातील वाद चव्हाट्यावर आला.  त्यातून बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत देखील झाली. अन् सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरोधात योगेंद्र पवार उभे ठाकल्यावर घर फुटल्याच्या भावनेतून प्रचाराचा नारळ फोडल्यावर अजित पवारांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी अजित पवारांनी आर.आर.पाटलांनी केसाने गळा कापल्याची खदखद बोलून दाखवली. कारण अजित पवारांच्या मानसिकतेचा विचार करता आर आर पाटलांनी सही केल्याने चौकशीचा ससेमिरा अजित पवारांच्या मागे लागला. अन् त्यातून इडीचे व इतर चौकशीचा पाठलाग चुकवण्यासाठी अजित पवारांसहित भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेत्यांनी भाजपाला जवळ केल्याचे आरोप झाले आहेत. याच्या मुळाशी आर आर पाटलांनी फाईलवर सही केल्याची घटना आहे. या मानसिकतेतूनच अजित पवारांनी वक्तव्य केल्याची दाट शक्यता आहे.  मात्र पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती खुद्द अजित पवारांनीच सिंचन घोटळ्याचे कोलित दिले आहे. विरोधक बदलले आहेत. मात्र आरोप तेच आहेत. त्यात महायुतीचे किती नुकसान होतेय हे निवडणुक निकालात स्पष्ट होईल.  दूरगामी विचार करता अजित पवारांसहित पक्षातील नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणाकडे कानाडोळा करणं महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषणावह नाही. त्याकडे शरद पवारांनी पक्षप्रमुख म्हणून दुर्लक्ष केले होते.  त्याचा परिणाम राज्यावर झाला आहे. सध्या कोण कोणत्या पक्षात कोणाचे काय चिन्ह असा नुस्ता गोंधळ उडाला आहे. राजकारणाने नैतिकतेची उणे शून्य पातळी गाठली आहे. पवारांनी पुरोगामीत्व गुंडाळून ठेवत तरूणांना संधी देण्याच्या नावाखाली घराणेशाहीचा पुरस्कार करत दोन नातु आमदार बनवण्यासाठी डावपेच टाकले आहेत….

आर आर पाटिल याच्या सहीमागे प्रामाणिकता की केसाने गळा कापण्याची कृती ही भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी होती की राजकीय डावपेच..?  हे पुन्हा चौकशी झाल्यावरच सिध्द होईल. महाविकास आघाडी तसे आश्वासन देईल असे वाटत नाही. कारण आपलेच दात व आपलेच ओठ ही म्हण राजकारणात प्रकर्षाने जाणवत आहे.

– ॲड प्रदीप गुरव
(लेखक विधिज्ञ तथा पत्रकार आहेत)

You may have missed

error: Content is protected !!