नातवासाठी आजोबा मैदानात
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघासाठी बारामतीच्या तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी अर्ज स्वीकारला
उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी जेष्ठ नेते शरद पवार, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदीप गुजर तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना योगेंद्र पवार म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याने आत्मविश्वास नक्कीच वाटतो, तर अनेक वर्षापासून मी समाजकार्यात आहे, माझ्या पाठीशी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी नक्कीच यशस्वी होईल.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे कधीच कोणाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहिले नाहीत मात्र प्रथमच नातवाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क बारामतीच्या तहसील कार्यालयात उपस्थित राहिले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि तोच विषय बारामती आणि परिसरात चर्चेचा राहिला आहे.
योगेंद्र पवार या एका उच्चशिक्षित युवकाला महाविकास आघाडीच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा मतदार नक्कीच स्वीकार करून त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील असा विश्वास यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला, तर मी 57 वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो, त्यानंतर आज 57 वर्षानंतर आलो आहे असेही पवारांनी व्यक्त केले.
