बारामतीत घडली हृदयद्रावक घटना.
बारामती : येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रूममध्ये एक नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना संपर्क करण्यात आला. मंगळवार दि 16 जुलै रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माळेगांव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रूममध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अर्भकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेवून बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यास उघड्यावर टाकून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारणावरून अज्ञात व्यक्ती विरोधात तालुक्यातील माळेगांव पोलिस ठाण्यात अर्भकाला जन्माला येण्यापासून रोखण्याच्या किंवा त्यांच्या जन्मानंतर त्याचा मृत्यु होण्यास कारणीभूत राहिल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत.
