शरद पवारांचे पंतप्रधानांसह केंद्र सरकारवर टिकास्त्र
शरद पवारांचे पंतप्रधानांसह केंद्र सरकारवर टिकास्त्र, केंद्र सरकार पक्ष फोडाफोडीमध्ये अधिक लक्ष देत असाल्याची टीका
बारामती : देशातील शेतकरी, व्यापारी यांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान, अर्थमंत्री व कृषीमंत्री यांना पहायला वेळ नाही, केंद्रातील सरकारला नागरिकांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा करायची नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका असुन, संवादच संपल्यामुळे त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह नागरिकांच्या समस्यावर होत असल्याची टीका राष्टवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधानांसह केंद्र सरकावर केली.
दिवाळीनिमित्त मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात खा.शरद पवार बोलत होते. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष सदाशिव ( बापू ) सातव, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शहा, संभाजी किर्वे, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी गटनेते सचिन सातव, सुशील सोमाणी, राजेंद्र गुगळे, आदी उपस्थित होते.
पुढे पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य करीत, पवार म्हणाले की, मी राज्यसभेत खासदार आहे, गेल्या दोन अधिवेशनात पंतप्रधान राज्यसभेत तासभरही आलेले नाहीत, तर अर्थमंत्र्यांनी विविध विषयांसंदर्भात खासदारांना विश्वासात घेऊन चर्चा करुन त्यातून प्रश्न सोडवायचे असतात मात्र चर्चेचा विसरच केंद्र सरकारला पडला आहे. संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे की काय ? असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे. तर केंद्र सरकारकडून मुलभूत नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पक्ष फोडाफोडीमध्ये अधिक लक्ष दिले जात असाल्याची टीका केली तर दुर्देवाने संवाद करण्याची पध्दतच सरकारने बंद केलेली दिसत आहे. केवळ माझीच नाही तर संसदेतील अनेक खासदारांचीही पंतप्रधान व अर्थमंत्री चर्चाच करत नाही अशीच भूमिका आहे असेही पवार यांनी व्यक्त केले.
