माळेगावचा मोळी पूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवारांशिवाय संपन्न

मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले, आंदोलनाला पवारांचा पाठींबा.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडणार होता मात्र, बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले व नंतर कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन, संचालक, व मराठा समाजाचे आंदोलक यांच्या हस्ते पार पडला. .
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातूनच अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये, अशी ठाम भूमिका मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतली होती. त्या पार्शभूमीवर कारखान्याचे संचालक मंडळ, पोलिस प्रशासन यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा देखील झाली, मात्र तोडगा न निघाल्याने तसेच मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला येणेच टाळले.
दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नाही. मात्र कारखान्याचे संचालक अथवा सभासदांनी मोळी पूजन करावे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला कार्यक्रमाला बोलाऊ नये, अश्या आशयाचे पत्र सकल मराठा समाजाकडून देण्यात आले होते.
तर कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप आले होते यावेळी मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला आंदोलक आक्रमक असल्याच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण होते तसेच पोलिसांनी कारखान्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त देखील ठेवला होता, तसेच सकाळ पासूनच मराठा आंदोलक देखील या कार्यक्रमस्थळी जमा होत होते.