बारामती लोकसभेसाठी नणंद – भावजय सामना रंगणार ?

बारामती : ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बंड आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील त्यांचा सहभाग, यामुळे राष्ट्रवादी पक्षात दुही आणि गटात विभागणी झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचेच उमेदवार समोरा-समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती लोकसभेसाठी नणंद – भावजय सामना रंगणार ? अशी चर्चा प्रसिद्धिमाध्यमात रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभे दोन गट झाल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय समीकरण असेल, या चर्चेला समाज माध्यमांत आणि जनतेमध्ये उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा प्रसिद्धिमाध्यमांत सुरू आहे. असे झाले तर त्यांचा मुकाबला विद्यमान खासदार आणि नणंद सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. याबाबत प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारले असता, बारामती लोकसभा निवडणुकीत कुणीही उमेदवार असेल तरी त्याचे स्वागतच आहे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणीही, कुठूनही निवडणूक लढवू शकतो, असे सांगितले. अजित पवार पक्षाविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. तर, अन्य ८ ज्येष्ठ
नेत्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे मिळविली. सध्या बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व खा. सुप्रिया सुळे करतात. या मतदारसंघात ६ विधानसभेच्या जागा आहेत.