बारामतीत हजरत मोहम्मद पैगंबर जयंती डीजे मुक्त होणार
बारामती : बारामती इस्लाम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा पैंगबर यांची जयंती दि.1 ऑक्टोबर रोजी बारामतीत डीजेमुक्त साजरा करण्याचा निर्णय ईद ए मिलादुन्नबी जलसा कमिटी बारामती यांच्या वतीने एकमताने घेण्यात आला असून समाजाने घेतलेल्या निर्णय आदर्शवत असल्याचे तसेच या निर्णयाचे बारामतीतील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
ही जयंती ईद ए मिलाद किंवा ईद ए मिल्लादुन्नबी या नावाने साजरी केली जात आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. यानिमित्ताने जयंती मिरवणूक काढली जाते. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त समाजोपयोगी, धार्मिक उपक्रम राबविले जातात. अन्नदान, मिठाईवाटप, शैक्षणिक साहित्यवाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. अलीकडील काळात या दिवशी डीजेचा वापर वाढला आहे. ही गोष्ट चुकीची असून, ती हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांशी सुसंगत नाही. त्यामुळे यावर्षी डीजेमुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.
डीजेच्या आवाजामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते, मा. उच्च न्यायालयानेही डीजेला परवानगी नाकारली आहे. त्याचे पालन केले जाणार असून. यासंबंधी समाजाकडून ईद ए मिलादुन्नबी जयंती उत्सव जलसा कमिटीतर्फे असिफ खान, कासम कुरेशी, जब्बार पठाण, मुनीर तांबोळी, युसूफ इनामदार, अमजद बागवान, अन्सार शिकिलकर, असलम तांबोळी, अबरार खान, अकरम, बागवान, समीर शेख, मोहीन शेख, मुजाहीद शेख आदींनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांची भेट घेत चर्चा करून दि.1 ऑक्टोबर रोजी बारामतीत डीजेमुक्त जयंती करण्याचा निर्णय घेतला.
