बारामती – नरसिंहपूर राज्य महामार्गावर अपघात सत्र सुरूच
बारामती : बारामती – नरसिंहपूर राज्य महामार्गावर अपघात सत्र सुरूच असून नागरिकांच्या जीवावर बेतत असलेल्या रस्त्याकडे प्रशासकीय बाबू मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
दि. २९ ऑगस्ट रोजी बारामती – नरसिंहपूर राज्य महामार्गावर सोनगाव, ता. बारामती याठिकाणी आसू, ता. फलटण येथील बापलेकाचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला, या हृदय द्रावक घटनेने दोन तालुक्याच्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, या घटनेचे दुख: संपले नाही तोच मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी गुणवडी, ता. बारामती याठिकाणी कऱ्हावागज, ता. बारामती येथील तरुण रुपेश अंकुश लष्कर वय २५ वर्ष याच्या मोटारसायकलला पीकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ही धडक एवढी जबरदस्त होती की, या तरुणाचा पाठीमागे बसलेला मुलगा देखील गंभीर जखमी झाला असून सद्या तो आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी गुणवडी, ता. बारामती येथे सदर महामार्गालगत असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या २९ फाटा या वितरिकेमध्ये झारगडवाडी, ता. बारामती येथील नानासो महादेव सोनावणे यांची मोटारसायकल रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने पडली असता डोक्याला मार लागून सदर व्यक्ती जखमी झालेली आहे. बारामती – नरसिंहपूर राज्य महामार्गाचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीचे झाले आहे त्यामुळे हे अपघात घडत आहेत असे गुणवडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गुणवडी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला अनेकदा अर्ज करून सदर महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याने या महामार्गावर सतत अपघात सत्र सुरूच आहे. त्यामुळे या सर्व अपघाताला सार्वजनिक खात्याचे संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे.
