पोलीस पाटील भरती प्रकियेचे वेळापत्रक जाहीर

बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासाठी पात्र उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारांना अर्जाचे वाटप व स्वीकारण्याचा कालावधी 7 ते 20 सप्टेंबर ( कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून) आहे. प्राप्त अर्ज छाननी 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी 29 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून यासाठी ओळखपत्र व प्रवेश पत्राचे वाटप 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान केले जाणार आहे. लेखी परीक्षा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षा उत्तीर्ण व मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारांची यादी 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानुसार 12 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10.30 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. अंतिम निवड यादी झालेल्या उमेदवारांची यादी 18 ऑक्टोबर रोजी उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पात्रता पुढीलप्रमाणे :
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय, 7 सप्टेंबर 2023 रोजी 25 वर्षापेक्षा कमी व 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावी. अर्जदार त्याच गावातील स्थानिक रहिवाशी असावा. अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी. ज्या प्रवर्गासाठी हे पद भरण्यात येणार आहे अशा प्रवर्गातील व्यक्तीनेच अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जदार सरकारी थकबाकीदार नसावा. अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असावे. अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा पदाधिकारी, सदस्य नसावा.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज 100 रुपये शुल्क आकारुन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध होतील. यापूर्वी अर्ज केलेला असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही. या जाहीरनाम्यानुसार विहीत मुदतीत पुन्हा नवीन अर्ज करावा. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखला किंवा जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, संबंधित गावाचा स्थानिक रहिवाशी असल्याबाबत तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायतीचे घरकर आकारणी पत्रक किंवा शेतजमीन असल्यास 7/12 उतारा व 8 अ उताऱ्याची मूळ प्रत आदी, आरक्षित संवर्गातील अर्जदाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाराऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र व अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी.
सरकारी थकबाकीदार नसल्याबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला, माजी सैनिक असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कागदपत्रे, कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झाली नसल्याबाबत तसेच चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याचा दाखला अर्जासोबत जोडावा. अर्जासोबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 300 रुपये व खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क भरल्याची पावती, लहान कुटुंबाचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र जाडावे. अर्जदाराने स्वतःचे पासपोर्ट आकाराचे अलीकडील काळात काढलेले दोन छायाचित्र (दोनपैकी एक छायाचित्र संबंधित गावचे तलाठी यांच्याद्वारा साक्षांकीत) जोडावेत.
लेखी व तोंडी परीक्षा :
उमेदवारांची 80 गुणांची वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये 80 गुणांपैकी किमान 36 गुण (45 टक्के) प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र असतील. लेखी परीक्षेअंती मुलाखतीस पात्र उमेदवारांची 20 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्र स्वतः उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांच्या कार्यालयातून घेवून जावे. प्रवेशपत्र पोस्टाने अथवा ऑनलाईन पाठविले जाणार नाहीत. प्रवेश पत्रातच परीक्षेचे ठिकाण नमूद करण्यात येणार आहे. प्रवेश पत्रावरील छायाचित्र हे उमेदवार स्वतः साक्षांकित करेल.
तोंडी परीक्षेच्यावेळी सोबत आणावयाची कागदपत्रे :
तोंडी परीक्षेच्यावेळी जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, जातीचा दाखला, संबंधित पोलीस ठाण्याची दाखल्याच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात. अर्जासोबत कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले लहान कुटुंबाचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र व स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसल्याबाबत कार्यकारी दंडाधिकारी, नोटरी यांच्या समोरील 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करावे. आरक्षित संवर्गातील अर्जदाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी.
निवड झालेल्या उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे :
शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतच जिल्हा शल्य चिकीत्सकांचे प्रमाणपत्र एका महिन्याचे आत, राखीव संवर्गातील अर्जदारांनी सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र, कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झाली नसल्याबाबत आणि पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याचा दाखला एका महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक राहील.
अर्जदारांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास, चुकीच्या अथवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्यास किंवा विहित नियमांचे व आदेशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास सदर उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना आहे. कोणत्याही टप्प्यावर आक्षेपाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारही उपविभागीय दंडाधिकारी यांचा असेल. अर्जदार हा जाहीरनाम्याच्या दिनांकास शासकीय नोकर, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेचा नोकर नियुक्तीबाबत कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा दबाव आणल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
पोलीस पाटील पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अधिकाधिक इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावे. अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून किरण चव्हाण ९६३७८१८१६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.