बिल मागितल्याचा राग अन् कोयत्याने हल्ला; बारामतीत पुन्हा कोयता दहशतीत वाढ
बारामती : बारामती शहरात किरकोळ कारणांवरून कोयते बाहेर काढण्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. हॉटेलमधील बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मद्यधुंद ग्राहकाने कोयता घेऊन हॉटेल मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी दुपारी सुमारे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास फलटण रोडवरील टाटा शोरूमजवळील कसबा परिसरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेलमध्ये काम करणारा गगन वर्मा याने ग्राहकाकडे बिलाची रक्कम मागितली. मात्र संबंधित ग्राहक मद्यधुंद अवस्थेत असल्याने पैसे देण्याऐवजी त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
बिल मागितल्याच्या कारणावरून त्या ग्राहकाने हॉटेलमधील कर्मचाऱ्याला दमदाटी करत शिवीगाळ केली. हा प्रकार वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालकाने मध्यस्थी करत संबंधित व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचाच राग आल्याने आरोपींनी कोयता व काठ्या घेऊन हॉटेल मालकावर धाव घेतली.
या हल्ल्यात हॉटेल मालकाच्या मस्तकावर कोयत्याचा वार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून ते जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर हॉटेल मालकाने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, किरकोळ कारणांवरून होत असलेल्या अशा हिंसक घटनांमुळे बारामती शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
