March 5, 2026

बारामतीत ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार; ज्येष्ठ महिलेची ४५ लाख ६० हजारांची सायबर फसवणूक

sddefault
बारामती  : बारामती शहरात सायबर गुन्हेगारांनी “डिजिटल अरेस्ट”चा धाक दाखवत एका ज्येष्ठ महिलेकडून तब्बल ४५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशन येथे  माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी मौजे डोर्लेवाडी येथील वयोवृद्ध महिला  यांना दिनांक १४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मोबाईलवरून एका अज्ञात इसमाने WhatsApp वर व्हिडिओ कॉल केला. सदर व्यक्तीने स्वतःचे नाव “संदीप पाटील” असल्याचे सांगत तो पोलीस अधिकारी असल्याचा बनाव केला. पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने फिर्यादींविरुद्ध अटक वॉरंट असल्याचे खोटे सांगत त्यांना “डिजिटल अरेस्ट” करण्यात येईल अशी भीती दाखवली. या भीतीचा फायदा घेत आरोपीने मानसिक दबाव निर्माण केला व त्यांच्या बँकेत असलेली फिक्स्ड डिपॉझिट (एफ.डी.) तोडण्यास भाग पाडले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले.
आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादींनी ३४ लाख ६० हजार रुपये आणि ११ लाख रुपये, अशी मिळून एकूण ४५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने वर्ग केली. त्यानंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे – पोलिसांचे आवाहन
बारामती शहर पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही व्यक्ती स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा न्यायालयातील अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारे भीती दाखवून पैसे मागितल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी.
याशिवाय कोणतीही संशयास्पद लिंक, OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती अज्ञात व्यक्तींना देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास शक्य तितक्या लवकर पोलिसांना कळविल्यास संबंधित बँक खात्यांवर तातडीने कारवाई करून रक्कम गोठविणे (Freeze) शक्य होऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत नागरिकांना अशा फसवणुकीपासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!