पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी उघड; बारामतीत २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती : बारामती शहरात चित्रपटातील ‘पुष्पा स्टाईल’ची आठवण करून देणारी गांजाची तस्करी उघडकीस आली असून तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा गांजा शहर पोलिसांनी जप्त केला आहे. बारामती शहरातील जळोची रोड परिसरात गांजा नी भरलेल्या दोन टाक्या पोलिसांना आढळून आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे लक्षात येताच अज्ञात इसमाने वाहनात असलेला मुद्देमाल जागीच सोडून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी तपासणी केली असता साधारण १५०० लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रत्येकी एक किलो वजनाचे एकूण २७० पॅकेट गांजा लपवून ठेवलेला आढळून आला आहे.
या पॅकेट्सची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तस्करीसाठी पाण्याच्या टाक्यांचा वापर करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला.
ही कारवाई बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
दरम्यान, या आढळून आलेला गांजा जप्त करण्यात आला असून, गांजाचा साठा नेमका कुठून आणण्यात आला व तो कुठे नेण्यात येणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बारामती शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
