February 11, 2026

सिगारेट उधारीवर देण्याच्या कारणावरून उसळला संताप; कोयत्याचे वार, चौघांवर गुन्हा दाखल

123

बारामती : उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून बारामती तालुक्यातील सांगवी येथे दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले असून महिला-पुरुषांसह चौघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका पान टपरीवर उधारीवर सिगारेट मागण्यावरून वादाची ठिणगी पडली. टपरी चालकाने उधारी नाकारल्याने संबंधित व्यक्ती संतप्त झाली. या किरकोळ वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि काही वेळातच दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी एकमेकांना जाब विचारण्यासाठी जमाव केला.

वाद वाढत जाऊन दोन्ही गट आमनेसामने भिडले. यावेळी कोयत्याचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या गोंधळात एका आरोपीने “माझ्या नादी लागला तर खल्लास करीन” अशी उघड धमकी दिल्याचीही तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित चार जणांविरुद्ध मारहाण, शस्त्राने दुखापत करणे, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!