January 22, 2026

तरुणीचा निर्घृण खून; माळरानावर मृतदेह आढळल्याने बारामती खळबळ

crime

बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. तालुक्यातील काळखैरेवाडी गावाच्या हद्दीतील खैरेपडळ परिसरात, सुपा–शेरेवाडी रोडलगत माळरानावर एका तरुणीचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. काळखैरेवाडी गावाच्या हद्दीत खैरेपडळ येथे अंदाजे २५ ते २७ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला. माळरानावर मृतदेह दिसून येताच ही बातमी गावात व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. प्राथमिक तपासात सदर महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता या महिलेवर अत्याचार करून त्यानंतर खून करण्यात आला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे .

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण तसेच अत्याचार झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.

या प्रकरणी माहिती देताना बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, काळखैरेवाडी गावाच्या हद्दीत खैरेपडळ येथे एका २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे संकेत मिळत असून, शवविच्छेदन अहवालानंतर अत्याचारासंदर्भातील बाब स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेनंतर सुपे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वान पथक, व वैद्यकीय तपास पथकाने पाहणी केली असून, पुरावे गोळा करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

या निर्घृण घटनेमुळे काळखैरेवाडी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या खूनप्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!