बारामतीत हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला; खंडणीसाठी दहशत
बारामती : बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात खंडणीसाठी दहशत निर्माण करत चायनीज हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश सिद्धनाथ काळे (वय २९, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विनायक मारक (मांबरी), राहुल चव्हाण, राज गावडे, आदित्य बगाडे, निहाल जाधव, विवेक (पूर्ण नाव अज्ञात) तसेच दोन अज्ञात तरुण, सर्व रा. शेळकेवस्ती, दादा पाटीलनगर, तांदुळवाडी, बारामती, यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 26 डिसेंबर रोजी रात्री प्रगतीनगर परिसरातील चिंचकर चौक येथे असलेल्या फिर्यादीच्या “आपले चायनीज” हॉटेलमध्ये घडली. आरोपींनी यापूर्वी हॉटेल चालू ठेवण्यासाठी फिर्यादीकडे हप्ता / प्रोटेक्शन मनी मागितली होती. मात्र फिर्यादीने ती देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी संगनमताने हॉटेलमध्ये प्रवेश करून फिर्यादीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यादरम्यान जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत आरोपींनी दुकानाच्या गल्ल्यातील ८,३०० रुपये रोख दहशतीने काढून नेऊन शस्त्रासह दरोडा टाकल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.
या घटनेनंतर संबंधित आरोपींविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे संपूर्ण प्रगतीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खंडणीसाठी वाढत असलेल्या हिंसाचारामुळे व्यापारी वर्गात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
बारामती शहरात गेल्या काही घडलेल्या सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. खंडणी, प्राणघातक हल्ले, मारहाणी, दहशतीच्या घटना वारंवार घडत असताना पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात दिवसाढवळ्या गुन्हे होत असताना सामान्य नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असून, “बारामतीत खरंच कायदा सुव्यवस्था आहे की नाही?” असा गंभीर सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शहराचा विकास, स्मार्ट सिटीचे स्वप्न आणि दुसरीकडे वाढती गुन्हेगारी — या विरोधाभासामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस यंत्रणेकडून ठोस कारवाई कधी होणार? की गुन्हेगारांना मोकळे रान देण्यात येणार? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
