हॉटेल बाहेर राडा करणारा एक आरोपी अटकेत
बारामती : भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेल बाहेर पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून काठ्या, लोखंडी गज व दगडांनी हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली असून बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केली आहे.
(दि. २९ नोव्हेंबर) रोजी सकाळी मानस पाटील (रा. तानाई नगर, बारामती) हे त्यांच्या मित्रांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यावेळी पार्किंगवरून अनोळखी मुलांशी वाद झाला. आरोपीदेखील जेवायला बसले, मात्र नंतर त्यांनी फोन करून सुमारे ८ ते १० जणांना बाहेरून बोलावले.
फिर्यादी पाटील व मित्र जेवण करून बाहेर येताच आरोपींनी अचानक काठ्या, लोखंडी गज व दगडांनी हल्ला चढवला. दगड फेकून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. पाटील व त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यात आली. फिर्यादीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड व गजाने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादींच्या जबाबासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली असून राम अनिल लोखंडे (वय 24, रा. खंडोबा नगर, बारामती) यास अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, दिपाली गायकवाड तसेच पोलिस कर्मचारी जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांच्या पथकाने केली असून पुढील तपास उपनिरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.
एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. हॉटेल चालक, व्यावसायिक व नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
गुन्ह्यात वापरलेल्या गाडीवर महाराष्ट्र शासन’ अशी पाटीअसलेल्या वाहनाचा गुन्ह्यात वापर; नागरिकांनी कसून तपासाची मागणी
बारामतीत घडलेल्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लिहिलेला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शासनाच्या नावाचा वापर करून गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या वाहनाचा वापर करणारे आरोपी प्रत्यक्षात शासकीय विभागाशी संबंधित आहेत का ? किंवा काहीजण शासनाच्या नावाचा गैरवापर करून स्वतःला प्रभावशाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का ? याबाबत तपासाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांकडूनही अशाच प्रकारे शासनाच्या नावाचा गैरवापर होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन आरोपींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
