बारामतीत दहशत माजवण्याचा प्रयत्न; महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
बारामती : बारामतीतील भिगवण रोडवरील हॉटेल वृंदावन परिसरात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला स्थानिक युवकांच्या टोळीने गॅंग एकत्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित विद्यार्थ्यासोबत त्याच्या मित्रांनाही गंभीर दुखापती झाल्या असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानस पाटील (वय 24) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काही स्थानिक युवकांनी त्याच्या गाडीला, गाडी आडवे घालून जबरदस्तीने मार्ग रोखला. “काय रे बोल, कुठला आहेस तू? बाहेरून येऊन मस्ती करायची नाही,” असे ओरडत आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू, कोयता, लाकडी दांडे, दगड, विटा अशा घातक शस्त्रांसह अचानक जीवघेणा हल्ला चढवला.
फिर्यादीत पुढे नमूद आहे की, आरोपी ओरडत होते, “मारा त्याला… जिवंत सोडू नका… तो जिवंत राहिला नाही पाहिजे,” असे म्हणत त्यांनी बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. पीडित विद्यार्थी आणि त्याचे मित्र जीव वाचवत तेथून दूर पळाले आणि उपस्थित नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला .
या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल १६ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींचा कसून तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या घटनेमुळे भिगवण रोड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आरोपी पसार होऊ नयेत म्हणुन बातमीत आरोपींची नावे घातली नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी .
