कॅफेत तरुणीचा विनयभंग ; फोटो व्हायरल करून बदनाम करण्याची दिली धमकी
बारामती : बारामतीतील टी. सी. कॉलेजजवळील बॅचलर कॅफेत तरुणीचा विनयभंग करून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका इसमाविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तेजस पानसरे (वय 20, रा. अकोले, ता. इंदापूर) याच्याविरोधात पिडीत तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी टी. सी. कॉलेज परिसरातील बॅचलर कॅफेत आरोपी याने पिडीत तरुणीचा जबरदस्तीने हात धरून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. तसेच “हा प्रकार तू घरच्यांना सांगितली तर तुझे फोटो घरी दाखवीन, तसेच ते फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन,” अशी धमकी दिली असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.
घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने पुढे धैर्य एकवटून संबंधित प्रकार पोलिसांना कळविला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी याच्याविरोधात विनयभंग आणि धमकी देण्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.
