December 6, 2025

बारामतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण; परिसरात खळबळ

pcmc-28_202111728101

बारामती : बारामती तालुक्यातील मौजे गुणवडी येथे अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या घराजवळील किराणा दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली होती. पालकांनी तिला सायंकाळी सातच्या सुमारास दुकानात पाठवले होते. संबंधित दुकानातून तिने वस्तू खरेदी केल्या असल्याची माहिती मिळाली असून मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.

मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने पालकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, शेजारी आणि दुकानातील लोकांकडे चौकशी केली असता ती किराणा दुकानातून वस्तू घेऊन गेल्याचे दिसून आले, मात्र त्यानंतर तिचा पत्ता लागला नाही. अखेर मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे गुणवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये आपल्या मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!