December 8, 2025

ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी केले गजाआड

234

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी धाडसपूर्ण कारवाई करत मुंबईतील तब्बल ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून गजाआड केले आहे. या कारवाईमुळे बारामती पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (पूर्व), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी एनडीपीएस कायदा तसेच इतर कलमांखाली एक गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख (उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख, वय २०, रा. वसई) यांच्याविरुद्ध तपास सुरू होता.

यातील समीर शेख हा घटनेनंतर फरार झाला होता. वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी त्याचा बारामती परिसरात वावर असल्याची माहिती बारामती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पथकाला समजले की आरोपी ‘ब्रँड रिव्हर’ या कपड्याच्या दुकानात नोकरी करत आहे. पोलिसांनी आखलेल्या कुशल योजनेनुसार दुकान परिसरात पाहणी करण्यात आली. आरोपीची ओळख पटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी असल्याची कबुली दिली. तत्काळ ही माहिती मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि आरोपीला पुढील तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, तसेच पोलीस अंमलदार निलेश वाकळे आणि राहुल लांडगे यांचा समावेश होता.

दरम्यान, आरोपीस तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास त्यांच्याकडून सुरू आहे.

error: Content is protected !!