October 23, 2025

डंपरखाली वृद्धाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको, प्रशासनाला इशारा

IMG_20250929_182132

बारामती  :बारामती–फलटण मार्गावरील भरचौकात झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिवसभर वर्दळीच्या ठिकाणी भरधाव डंपरखाली वृद्ध चिरडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

मृत व्यक्तीचे नाव मारुती उमाजी पारसे (वय ७०) असे असून ते सायकल घेऊन चौक ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-१२ एसएक्स ४७५० या डंपरने त्यांना जबर धडक दिली. धडकेनंतर ते थेट चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर मोठी गर्दी जमा झाली. बारामती शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा डंपर जप्त करण्यात आला असून चालक राजनारायण बलजीत सिंग अपघातानंतर फरार झाला आहे. त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता रोको आंदोलन

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळीच रस्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शेवटी नागरिकांना ‘बारामती शहरातून जड वाहने बंद करण्याबाबत लेखी आश्वासन’ देण्यात आल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती

 जड वाहनांमुळे याआधीही गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. खंडोबा नगर येथे डंपरखाली येऊन एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर शहरात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती; मात्र काही दिवसांतच पुन्हा परवानग्या देण्यात आल्या.

नागरिकांनी जड वाहनांच्या प्रवेशबंदीची मागणी पोलिस व प्रांत कार्यालयाला पुन्हा पुन्हा निवेदनांद्वारे केली होती. पण ठोस निर्णय न घेण्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

काळुराम चौधरींचा आरोप आणि मोर्चा

घटना समजताच बसपाचे काळुराम चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांसह रस्ता रोको केला.
चौधरी यांनी आरोप केला की, अवैध वाहतुकीला परिवहन विभागाकडून हप्ते घेऊन अभय दिले जात आहे, त्यामुळेच अपघातांचा सिलसिला थांबत नाही. यापूर्वीदेखील त्यांनी ताटीचे सामान देऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला होता.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. परिसरातील वाहतूक नियंत्रण, वाहन तपासणी आणि सुरक्षा उपाययोजनांसंदर्भात नागरिकांनी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.
“जड वाहनबंदीच्या निर्णयात कुचराई झाल्यास पुढील मोठे आंदोलन उभे करू,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!