बंदी असलेल्या इलेक्ट्रिक सिगारेट विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती : बारामती शहरातील तांदूळवाडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घातलेल्या इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्या व्यक्तीला जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी विदेशी बनावटीच्या ‘मेड इन चायना’ इलेक्ट्रिक सिगारेटचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी काजळे नामक इसमाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांदूळवाडी येथील टी पॉईंट दुकानात प्रतिबंधित इ-सिगारेटची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, मोठ्या प्रमाणात इ-सिगारेटचा साठा आढळून आला. तपासात संबंधित व्यक्ती हा माल जवळ बाळगून विक्रीसाठी तयार ठेवत असल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलीस हवालदार वैभव साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काजळे या इसमावर इलेक्ट्रिक सिगारेट प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३५ हजार रुपये इतकी असून, तो पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.
बारामती शहरात प्रतिबंधित इलेक्ट्रिक सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.