बारामतीत अवैध गुटख्याचा धंदा फोफावला – प्रशासनाचे डोळेझाक?

बारामती : बारामती शहरात अवैध गुटख्याचा बेकायदेशीर व्यापार दिवसेंदिवस फोफावत चालला असून, कायद्याला चक्क धाब्यावर बसवून हा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीतील कृष्णाई लॉन्स नजीक, पानसरे सिटीत, एका रहिवाशाने चक्क रेसिडेन्शिअल सदनिकेतच गुटख्याचा साठा करून विक्री सुरू केली आहे. स्वतःच्या घरातूनच गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे नागरिकांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. शहरातील प्रशासकीय अधिकारी मात्र या बेकायदेशीर धंद्यावर आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. बारामतीचे आमदार आणि राज्याचे मंत्री अनेकदा अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आदेश देतात. मात्र हे आदेश केवळ कागदापुरतेच राहिले आहेत का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
गुटख्याच्या अवैध व्यापाराची व्याप्ती इतकी वाढली आहे की बारामती आणि परिसरात या व्यवहाराची उलाढाल कोट्यवधींमध्ये पोहोचली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रोजंदारीतच गुटख्याचा व्यापार कोटी रुपयांहून अधिक होत असल्याचे बोलले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारा हा धंदा नक्की कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे, हा प्रश्नही नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गुटख्याच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. सरकारने बंदी घालूनही बेकायदेशीर विक्रीला आळा बसत नसल्यामुळे हा मुद्दा आता लोकांच्या आरोग्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेशीही संबंधित बनला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी सर्वसामान्य बारामतीकरांकडून जोर धरू लागली आहे.
गुटखा विक्री बातमी क्रमशः ..