भगरितून विषबाधा? झारगडवाडीतील सहा जण रुग्णालयात दाखल

बारामती : बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात भगरीच्या भाकरीमधून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावातील सहा जणांना भगर आणि साबुदाण्याचे पीठ दळून तयार केलेल्या भाकरी खाल्ल्यानंतर उलट्या, जुलाब व मळमळ होण्याचा त्रास झाला. त्यांना तातडीने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली असून संबंधित नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. मात्र अहवाल अद्याप आलेला नाही. नवरात्र उत्सव सुरू असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात भगर, साबुदाणा यांसारख्या उपवासातील पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे या घटनेने अनेक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या संदर्भात आवाहन केले आहे की, “नवरात्रोत्सवाच्या काळात तेलकट पदार्थ खाणे टाळावे. भगर उत्तम दर्जाची विकत घेऊन ती नीट भाजून मगच खावी. आरोग्याशी तडजोड करणे धोकादायक ठरू शकते.”
गावात या घटनेनंतर प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले असून पुढील अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.