देवीच्या दारात रक्तरंजित हल्ला ; पाच जणांवर कोयत्याने वार, बारामती हादरलं !

बारामती : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बारामती तालुक्यातील वंजारवाडी गाव हादरवणारी घटना घडली आहे. जुन्या भांडणातून तब्बल पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२२ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिरासमोर घडली.
याप्रकरणी अमोल अण्णा चौधरी यांच्या फिर्यादीवरून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे या सात जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यात सुनिल गोरख चौधरी, अमोल अण्णा चौधरी, भारत गोकुळ चौधरी, सागर चंद्रकांत चौधरी आणि आदित्य सर्जेराव चौधरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीसह सर्वजण नवरात्र उत्सवानिमित्त देवीची ज्योत राशीन येथून आणून वंजारवाडीतील दत्त मंदिरासमोर पारंपारिक वाद्यांसह पूजा व उत्सव साजरा करत होते. त्याचवेळी एका चारचाकीतून आरोपी आले. त्यांच्या हातात कोयता, चाकू अशी धारदार हत्यारे होती. त्यांनी अचानक मंदिरासमोर उभ्या असलेल्या चौधरी बंधूंसह इतरांवर हल्ला केला.
या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.