डॉ. अमरसिंह पवार यांची वैद्यकीय परिषदेवर विशेष तज्ञ म्हणून निवड

बारामती : बारामतीचे ज्येष्ठ वैद्यकिय तज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे माजी उपाध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार यांची प्रतिष्ठीत महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) मुंबई येथे भूल तज्ञ विषयाशी संबंधित वैद्यकीय निष्काळजीपणा प्रकरणाच्या चौकशी व छाननीसाठी विशेष तज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून विविध वैद्यकीय तक्रारींवर सुनावणी केली जाते. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या गंभीर प्रकरणांमध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. याच अनुषंगाने भूल तज्ञ आणि शस्त्रक्रिया तज्ञ या विषयातील प्रकरणाच्या छाननीसाठी बारामतीचे ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. पवार यांची तज्ञ म्हणून निवड झाली आहे.
डॉ. पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये राज्यस्तरीय पदावर काम करताना समाजाच्या विविध प्रश्नांवर भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव वाढला असून त्यांचे कौतुक केले जात आहे.