नगरपालिकेचा दणका ; अकॅडमी विरोधात गुन्हा दाखल

बारामती : बारामती शहरात अनधिकृत जाहिरातींवर नगरपालिकेने कारवाई करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विनिक्स सायन्स अकॅडमी, बारामती यांनी विनापरवाना शहरात ठिकठिकाणी जाहिरातीचे फ्लेक्स लावल्याप्रकरणी नगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख संजय प्रभुणे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर आणि परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, अकॅडमी विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा फ्लेक्स लावत असतात. नगरपालिकेच्या कारवाईमुळे यापुढे अशा बेकायदा जाहिरातींवर अंकुश बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धाडसी पावलाबद्दल बारामती नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे नागरिकांमध्ये कौतुक होत असून, शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी नगरपालिकेने केलेली ही कारवाई योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.