भरदिवसा घरफोडी; साडेचार लाखांचा मुद्देमाल गेला चोरीला

बारामती : भरदिवसा घरफोडी करून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना मौजे भापकर वस्ती, कारखेल (ता. बारामती) येथे घडली आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी फिर्यादी बाळासो मांढरे हे शेतातील कामासाठी गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून पत्नीने आरडाओरडा करून पतीला बोलावून घेतले. त्या वेळी घरातून तीन इसम पळून जात असल्याचे निदर्शनास आले.
घराची पाहणी केली असता, घराचा सेफ्टी दरवाजाचा पॉइंट तोडलेला होता. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर कपाटाचे दरवाजे उघडे होते तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तपासणीदरम्यान कपाटातील सुमारे चार लाख पंचावन्न हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
यावरून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मुद्देमाल चोरल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची फिर्याद बाळासो मांढरे यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.