बारामतीत धक्कादायक घटना किरकोळ वादातून तरुणाचा बळी

बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी गावात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत सौरभ विष्णु इंगळे (वय २५, रा. पारवडी) याच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी १) रामदास जगन्नाथ इंगळे व २) प्रमोद रामदास इंगळे (दोघे रा. इंगळेवस्ती, पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची हकिकत अशी की, नमूद दिवशी सौरभ व आरोपी प्रमोद यांच्यात पूर्वीच्या वादातून शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यावेळी आरोपी रामदास इंगळे यांनी सौरभ यास शिवीगाळ केली. यावरून सौरभ व प्रमोद यांच्यात हातघाईची मारहाण सुरू झाली. दरम्यान, रामदास यांनी सौरभ यास मागून पकडून “याला सोडू नको, मार याला” असे सांगितल्याने प्रमोद इंगळे यांनी जवळ असलेले टोकदार हत्यार काढून सौरभच्या गळ्याखाली उजव्या बाजूस वार केला. या वारामुळे सौरभ गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला.
जखमी अवस्थेत सौरभला तातडीने उपचारासाठी बारामती येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचार सुरू करण्यापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित केले.