नग्न व्हिडिओ काढीत शिक्षकाला केले ब्लॅकमेल ; दोन जण अटकेत

बारामती : सोशल मीडियाचा वापर करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच बारामतीतील एका शिक्षकाला अनोळखी मुलींच्या माध्यमातून नग्न व्हिडिओ पाठवून नग्न होण्यास भाग पाडत धमक्या देत सुमारे दीड लाख रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून, नागरिकांनी अशा सायबर ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात न अडकण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मे २५ ते २९ ऑगस्ट २०२५ या दरम्यान आरोपींनी एका शिक्षकाला त्याच्या मोबाईलवर अनोळखी मुलीच्या ( महिलेच्या ) माध्यमातून संपर्क साधला त्या महिलेशी नग्न व्हिडिओ पाठवला. त्यानंतर “नग्न होऊन स्वतःचा व्हिडिओ दाखव” असा दबाव टाकला. भीती दाखवत आरोपींनी त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. “वरिष्ठांना तक्रार करून नोकरी घालवू, पैसे नाही दिले तर जिवंत ठेवणार नाही” अशा शब्दांत दमदाटी केली. या धमक्यांच्या छायेत शिक्षकाकडून हप्त्यांमध्ये १,१५,३५० रुपये उकळण्यात आले. शिवाय प्रकरण मिटवण्यासाठी आणखी १ लाख रुपये देण्याची मागणीही आरोपींनी केली.
मात्र फिर्यादी वेळीच सावध झाला आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. या प्रकरणी आरोपी अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा. बर्गे वस्ती, आळंदी रोड, चाकण, ता. खेड) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. कोकणे चौक, चाकण, ता. खेड) या दोघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत. आरोपींनी या आधीही इतर कोणाला अशाच प्रकारे जाळ्यात ओढले आहे का ? याचाही तपास सुरू आहे.
नागरिकांना सावधानतेचा इशारा
सामाजिक माध्यमांवरून अनोळखी व्यक्तींकडून आलेले संदेश, व्हिडिओ किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीने कोणीही धमकी देऊन पैसे मागत असल्यास त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करावी. कोणालाही वैयक्तिक व्हिडिओ/फोटो शेअर करू नये. ब्लॅकमेलिंग झाल्यास घाबरून पैसे न देता थेट पोलिसांची मदत घ्यावी.