October 24, 2025

घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह; परिसरात खळबळ

loni

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा परिसरात राहत्या घरात एका व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव अशोक डुंभडे (वय ५०) असे असून याबाबत नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा परिसरातील एका घरात हॉटेलमध्ये काम करणारा व्यक्ती भाड्याने राहत होता. या भाडेकरूकडे नातेवाईक म्हणून अशोक डुंभडे हे आले होते. मात्र भाडेकरू तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान, दोन दिवस उलटूनही घराचा दरवाजा न उघडल्याने तसेच आवाज दिला तरी आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने घरमालकाने संशय व्यक्त करून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आतून बंद असलेला दरवाजा तोडला असता डुंभडे यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात लोकांची मोठी गर्दी झाली. घटनेबाबत पोलीस पुढील तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!