शिर्सुफळ येथे दोन लाखांहून अधिकचा गुटख्याचा साठा जप्त

बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटख्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे २.३० लाखांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत दिनांक २४ जुलै रोजी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील या पेट्रोलिंग करत असताना त्यांना बारामती तालुका पोलीस हद्दीत गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तातडीने मौजे शिर्सुफळ येथे धाव घेतली. तेथे मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी (MH 42 BB 7240) ही शिरसुफळ गावाच्या समाजमंदिराजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संबंधित गाडीची तपासणी केली असता चालकाने आपले नाव सागर साबळे (वय ३२, रा. कटफळ, ता. बारामती) असल्याचे सांगितले. गाडीच्या झडतीदरम्यान २,३०,२५० किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण अवैध माल जप्त केला असून आरोपी सागर साबळे याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची बारीक नजर असून, अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .
गुटखा विक्रीतील मोठा मासा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता
पोलिसांना जरी एक सप्लायर सापडला असाला तरी याचा धागा पकडीत अधिक तपास केल्यास अवैध गुटखा विक्रीतील मोठा व्यापारी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने पावले उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जर हा बारामतीतील मोठा व्यापारी पोलिसांच्या हाती लागला तर तालुक्यातून गुटख्याचे समुळ उच्चाटन करण्यात पोलिसांना यश मिळेल अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.