पिण्यासाठी पाणी मागितले म्हणुन दोन महिलांना बेदम मारहाण

बारामती : पाणी मागितल्याच्या कारणावरून दोन महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 6 जुलै 2025 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला व तिची नणंद तांदुळवाडी येथे आत्याकडे जात असताना नणंदेला तहान लागल्यामुळे त्या बारामती एमआयडीसीमधील वेस्पा कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या एका वर्कशॉपमध्ये पाणी मागण्यासाठी गेल्या. त्याच वेळी वर्कशॉपमध्ये उपस्थित असलेल्या चार अनोळखी इसमांनी महिलांशी अरेरावी केली. त्यांनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्यापैकी एका इसमाने लाकडी दांडक्याने मारहाण करत महिलेला गंभीर दुखापत केली.
या घटनेनंतर संबंधित महिलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चार इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.