December 9, 2025

बारामतीत गोमांसाची तस्करी उघडकीस, चौघांवर गुन्हा दाखल

IMG_20250707_093942

बारामती : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात गोमांसाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघडकीस आली असून, पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकत ५ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद पोलीस कर्मचारी राजू लकप्पा बन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आजम बाबा कुरेशी (रा. खाटीक गल्ली, बारामती),  मुशरफ मौल्ला कुरेशी (रा. मोरगाव रोड, कसबा, बारामती) आणि अन्य दोन अनोळखी इसम (नाव-पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • ५१० किलो गोमांस – सुमारे ₹८१,६००/- किंमत
  • मांस कापण्याचे सत्तूर – (मूल्य नमूद नाही)
  • होंडा सिटी कार (MH14 AV 3373) – अंदाजे ₹२,००,०००/-
  • पांढरी पिकअप गाडी (MH14 EM 3391) – अंदाजे ₹३,००,०००/-
    एकूण जप्त मालमत्तेची किंमत सुमारे ₹५,८१,६००/- इतकी आहे.

दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पहाटे तांदुळवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी हजर राहून मांसाची पाहणी केली आणि काही नमुने तपासणीसाठी घेतले. उरलेले मांस पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

तपासणीत हे मांस नाशवंत व मानव शरीरास अपायकारक असल्याचे निष्पन्न झाल्याने ते बारामती नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये खोल खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आले.

या प्रकारामुळे बारामती परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे.

error: Content is protected !!