January 22, 2026

जबरी चोरीचा गुन्हा काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक

12

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका जबरी चोरीचा गुन्हा केवळ काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये चोरी गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बारामती परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी निर्देश दिले होते. या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने क्षेत्रात गस्त वाढवली होती.

दरम्यान, दिनांक ३ जून रोजी रात्री ९ वाजता भिमराव पिंगळे हे पिंगळेवस्ती, शिरसणे येथून पाहुणेवाडी गावाच्या हद्दीतून मोटारसायकलवरून घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला आडवे जावून मारहाण केली व त्यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि १८,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत पिंगळे यांनी माळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपींमधील एकाने दुसऱ्याला “अक्षय” या नावाने संबोधले होते. त्यावरून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय चंद्रकांत जाधव (वय २४ वर्षे, रा. खांडज, बारामती) व मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे ( वय१९ वर्षे, रा. पाहुणेवाडी, बारामती) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल व ५,००० रुपये रोख असा एकूण १८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलिस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे व अमोल वाघमारे यांनी केली.

error: Content is protected !!