June 28, 2025

बारामतीत पोलिसांच्या कारवाईत घातक इंजेक्शनचा साठा जप्त

IMG_20250604_225302

बारामती : बारामती शहरात शरीरास घातक असलेल्या इंजेक्शनचा साठा पोलिसांनी कारवाई करीत घातक असलेले इंजेक्शन विक्री करणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली असून दुसरा इसम फरार झाला आहे.

ता. ३ जून रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना ईलाईट जिमजवळील सर्व्हिस रोडवर क्रेटा (क्र. एमएच १४ जेए ०९०१) या चारचाकीत दोन इसम बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन विचारणा केली असता, त्यातील एकाने आपले नाव तन्मय कल्याण बनकर (वय २६, रा. सहयोग सोसायटी समोर, बारामती) असे सांगितले. दुसरा इसम मात्र गाडीतून उतरून पसार झाला. तन्मयने त्याचे नाव राहुल उपाडे असल्याचे सांगितले, मात्र अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करू लागला.

त्यामुळे पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, डिकीत खाकी बॉक्समध्ये मेफेनटर्मिन (Mephentermine) या शरीरास अत्यंत घातक ठरणाऱ्या इंजेक्शनच्या ९० बाटल्या आढळून आल्या.

याप्रकरणी  पोलीस कर्मचारी जितेंद्र शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी तन्मय बनकरला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी राहुल उपाडे (पूर्ण नाव माहिती नाही) सध्या फरार आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिताडे करत आहेत.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सचिन बुगड यांनी पोलिस स्टेशनला भेट देऊन माहिती दिली की, हे इंजेक्शन हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वापरले जाते. मात्र, अलीकडे काही तरुण व्यायाम व बॉडीबिल्डिंगसाठी याचा गैरवापर करीत आहेत. या इंजेक्शनचा वापर आरोग्यास अतिशय घातक ठरतो. यातून किडनी निकामी होणे, रक्तदाब वाढणे व कायमस्वरूपी तंद्री लागणे अशा गंभीर परिणामांचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर औषधांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच तरुणांनी अशा इंजेक्शनचा वापर टाळून पारंपरिक व नैसर्गिक मार्गाने व्यायाम करून आरोग्यसंपन्न जीवनशैली अंगीकारावी, असेही त्यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, रत्नदिप भंडारे, अमीर शेख, अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, जितेंद्र शिंदे, अक्षय सिताप, सागर जामदार, दत्तात्रय मदने व अमोल देवकाते यांनी केली.

error: Content is protected !!