वयोवृद्ध महिलेची तब्बल 19 लाख रुपयांची फसवणुक
बारामती : वयोवृद्ध महिलेला पॉलिसीचे आमिष दाखवून तब्बल 19 लाख 29 हजार 292 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने वारजे माळवाडी, पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादी वयोवृद्ध महिलेला पॉलिसीशी संबंधित वारंवार फोन करून विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी महिलेकडून ऑनलाईन पद्धतीने विविध खात्यांवर पैसे ट्रान्सफर करून घेतले. ही आर्थिक फसवणूक 18 जानेवारी 2025 ते 6 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात आयटी कायद्यानुसार व फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले जात आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
