बारामतीत पोलिस कर्मचारी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

बारामती : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार संतोष कांबळे हे दिनांक 29 मे रोजी रात्री 9.30 ते 10.00 या वेळेत आपले शासकीय कर्तव्य करत होते. यावेळी विना नंबरची वेरणा गाडी घेऊन आलेल्या एका अज्ञात चालकाने कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी कांबळे व त्याच्यासोबत असलेल्या दोन अंमलदार यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसेच त्याला त्याचा जाब विचारल्यावर अंगावर धावुन जावून शिवीगाळ करीत आरेरावीची भाषा वापरली.
सदरच्या अज्ञात व्यक्तीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला असून, कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी यांना शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरली तसेच त्यांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळीच मुसक्या आवळायला हव्यात
बारामतीत वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे प्रस्त आता थेट पोलिसांवरच येवू लागले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गुन्हेगाराच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात असा सुर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.