May 30, 2025

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक

sddefault

पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने एक व्यक्ती सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोथरूड, पुणे येथील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीस एका अनोळखी महिलेचा फोन आला. तिने स्वत:ला अरविंद दीक्षित नावाच्या व्यक्तीची असिस्टंट असल्याचे सांगितले. दीक्षित हे सीएफ फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट असून, केकेआर एशिया पॅसिफिक कंपनीत कार्यरत असल्याचे तिने सांगितले. सदर कंपनी ही शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील मार्गदर्शन करते आणि ती सेबी नोंदणीकृत असल्याचाही दावा करण्यात आला.

त्यानंतर महिलेने पीडिताला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले आणि नोंदणीसाठी एक लिंक पाठवून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला फक्त 10 हजार रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले. काही दिवसांतच 45 हजार रुपयांची अधिक गुंतवणूक सुचवण्यात आली. ॲपवर दिवसेंदिवस नफ्याचे आकडे दाखवत पीडिताचा विश्वास संपादन करण्यात आला.

हळूहळू एकूण 13 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक पीडित व्यक्तीकडून करवून घेण्यात आली. ॲपमध्ये दाखवल्यानुसार, या गुंतवणुकीवर 29 लाख 94 हजार रुपयांचा नफा झाल्याचे दिसत होते. पीडिताने या पैकी 15 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार अयशस्वी ठरला.

त्यावर संबंधित महिलेला संपर्क केल्यावर तिने सांगितले की, 15 टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल, म्हणजे आणखी 2 लाख 59 हजार रुपये भरावे लागतील. अन्यथा खाते गोठवले जाईल व माहिती इन्कम टॅक्स विभागाला दिली जाईल, असा दमही दिला गेला.

या प्रकारामुळे पीडित व्यक्तीने तत्काळ सतर्क होत थेट सेबीकडे तक्रार दाखल केली. सेबीने स्पष्टपणे सांगितले की, अशा कोणत्याही व्यक्ती वा संस्थेशी त्यांचा काहीही संबंध नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!