अबब… बारामतीतील तरुणाई गांजाच्या आहारी
बारामती : पालकांनो सावध व्हा आपला पाल्य नशा करत नाही ना ? याची खात्री करा. त्याचे कारणही तसेच आहे मागील काही दिवसात पोलिसांना लहान-लहान मुले कोवळ्या वयात गांजा ओढताना निदर्शनास आली आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघा विरोधात आणि तालुका पोलिस ठाण्यात दोघाविरोधात असे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बारामतीत नाशा करणाच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात होत्या आणि आहेत त्याची वेगवेगळी प्रकाराने दिवसेंदिवस समोर येत आहेत, काही मुले इंजेक्शन घेत आहेत, काही इलेक्ट्रिक सिगार ओढत आहेत तर आता चक्क काही गांजा ओढताना निदर्शनास आली आहेत. त्यामुळे एकूणच बारामती शहर आणि तालुक्यातील युवापिढी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून नशेच्या आहारी जाताना निदर्शनास येत आहे.
एकूणच त्यामुळे या अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी पडताना दिसत आहे. बारामतीतील अनेक तरुण गांजासारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून, पोलीस प्रशासनाने नुकत्याच केलेल्या कारवाईत अनेक तरुणांवर गांजा ओढताना गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ सेवन करीत असलेलेल्या तरुणांचे हे चित्र शहरातील वाढती चिंता अधोरेखित करते.
गांजाच्या सेवनामुळे युवा पिढी शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमकुवत होत चालली आहे. शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक आयुष्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही प्रशासकीय यंत्रणा प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरात पुनर्वसन केंद्रांची कमतरता, जनजागृतीच्या अभावामुळे तरुण नशेच्या गर्तेत अडकत आहेत. या समस्येवर त्वरित उपाययोजना न केल्यास पुढील काळात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. प्रशासनाने अधिक कठोर कारवाई व जनजागृती मोहिमा राबवाव्यात, अशी मागणी देखील जोर धरत आहे.
